ठाणे महापालिका क्षेत्रात नवीन व्हेरिएंटचे पाच रुग्ण आढळले असून यामध्ये चार पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे. या पाचवी जणांची प्रकृती स्थिर असल्याने त्यांना गृहविलगीकरणात ठेवण्यात आले आहे. तर ठाण्यात आता नवीन व्हेरिएंटच्या रुग्णांची संख्या आता सहा वर पोचली आहे. दुसरीकडे वाढत्या रुग्णांमुळे ठाणे महापालिकेची यंत्रणा देखील अलर्ट मोडवर असून यापुढे तपासण्या वाढवण्यात येणार असल्याचे प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. राज्यात तसेच मुंबई आणि ठाणे शहरात नवीन व्हेरिएंटच्या रुग्णांमध्ये वाढ होत असून त्यामुळे सरकारी यंत्रणा आता कामाला लागली आहे. सुरुवातीला एक १९ वर्षीय मुलीला ठाणे महापालिकेच्या कळवा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यानंतर आता रविवारी आणखी पाच रुग्णांची भर पडली आहे. यामध्ये चार पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे. या सर्वाना ताप आल्याने त्यांची कोरोना टेस्ट करण्यात आली. त्यानंतर त्यांचे नमुने पुण्याच्या लॅबमध्ये पाठवण्यात आल्यानंतर ते नवीन व्हेरिएंटचे पॉसिटीव्ह असल्याचे उघड झाले आहे. मात्र त्यांची प्रकृती स्थिर असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांना गृहविलगीकरणात ठेवण्यात आले असल्याची माहिती पालिका प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.